छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो):महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये गैरप्रकार, निकालातील विसंगती आणि परीक्षाप्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आज सकाळी विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन केले. यावेळी एमपीएससी पेपरफुटीची पारदर्शक पध्दतीने चौकशी व्हावी अशी मागणी केली.
परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. यावेळी एमपीएससी अध्यक्ष व सचिव यांच्या पदावरील जबाबदारीचा पुनर्विचार करून त्यांच्या जागी निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमेच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी.
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास लक्षात घेता आयोगाच्या सर्वोच्च स्तरावरील प्रशासकीय जबाबदारीची वस्तुनिष्ठ समीक्षा करण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंधित पदाधिकार्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेऊन आयोगावरील विश्वास पुनस्थापित करण्यासाठी सक्षम व निष्पक्ष अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी.
तसेच गट-ब परीक्षेसंदर्भात विद्याध्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांवर आठ दिवसांच्या आत सविस्तर व अधिकृत स्पष्टीकरण देण्यात यावे तसेच कथित गैरप्रकारांबाबत चौकशी करण्यात यावी. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांचे पारदर्शक पद्धतीने निराकरण करून प्रत्येक महत्त्वाच्या आक्षेपावर कारणासहित अधिकृत उत्तर उपलब्ध करून द्यावे. आवश्यकतेनुसार स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ तसेच कृषिसेवा परीक्षेतील वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भातील तक्रारी व कथित त्रुटींची चौकशी करण्यात यावी. वर्णनात्मक उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन हे उमेदवारांच्या अंतिम गुणवत्तेवर थेट परिणाम करणारे असल्याने तपासणी पद्धती, मॉडरेशन, गुणांकनातील सुसंगती आणि संबंधित प्रक्रियेची निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी. आदी मागण्या यावेळी केल्या. यावेळी आंदोलनात प्रा. उत्तम गोरे, शंकर शिंदे, बाळासाहेब शिंदे, यादवराव मारकड सह आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.














